Thursday, September 13, 2007

मवाळ सेहवाग??

आपल्या आक्रमक खेळाला लगाम लावण्याचा निर्णय वीरेंदर सेहवागने घेतला आहे. रविवारी येथे आपले मनोगत व्यक्त करताना पुनरागमनासाठी सज्ज असलेला सेहवाग म्हणाला, 'चांगल्या सुरूवातीनंतर विकेट फेकण्याची गफलत करायची नाही असा मी निर्धार केलाय.' इति मटा.

वीरुने म्ह्टलय खरं. पण म्या अज्ञान्याची अशी शंका की 'चांगली सुरुवात' आणि आपले साहेब यांचे विळ्या- भोपळ्याचे सख्य!! मग वीरू आपले शब्द खरे कसे ठरवणार? आणि या वाक्यातून मला असा वास येतोय की चांगली सुरुवात झाली तर विकेट नाही फेकणार म्हणजे (आमच्यासाठी) जुन्या काळात, मनोज प्रभाकर आणि नयन मोंगिया ४० ओव्हर झाल्या की फलंदाजीला येऊन जसे पिदवायचे तसा हा करणार? अरे २० षटकाच्या सामन्यात तू आक्रमणाला लगाम घालणार मग काय उपयोग त्या आक्रमणाचा? हे म्हणजे एखाद्या सैनिकाला राजाने दरबारात सांगावे की इथे तलवार म्यानात टाक, उगीच कुणालातरी लागेल. आणि त्या सैनिकाने रणांगणात गेल्यावर सुद्धा राजाची आज्ञा म्हणून घुम्यासारखे बसून राहावे. जिथे जे करायला हवं, तिथे तेच आणि तिथेच ते करायचं असतं. माझ्यामते सेहवागने चांगली सुरुवात होईपर्यंत थांबावे (म्हणजे एक ओव्हर. कारण सेहवाग एक ओव्हर टिकला तर ती त्याच्यासाठी चांगली सुरुवात असते) मग फटकेबाजी सुरु करावी.

हे सारे आम्ही वीरुभाईच्या आकसापोटी लिहित आहोत असे मात्र मुळीच नाही. कधी काळी आम्हीदेखील त्याच्या फलंदाजीवर फ़िदा होतो. आणि फलंदाजीपेक्षा त्याच्या डेरिँगबाज स्वभावावर. शोएब आणि ली ला चहोबाजूना धाडणारा, २९५ वार असताना सकलेन ला पुढे येऊन उचलण्याची हिम्मत असलेला, न्यूझीलंड मध्ये पानगळती प्रमाणे बाकीचे साथीदार एक अंकी धावा करून ग़ळत असताना दोन शतके ठोकणारा सेहवागही आम्ही पाहिला आहे. नुसती बॅटिंगच नव्हे तर त्याच्या slow offspin चेही आम्ही फॅन!! श्रीलंकेत साऊथ आफ्रिकेविरुद्ध आशा सोडून दिलेला सामना एकहाती आपल्या spin बरोबर फिरवला होता. ४० व्या ओव्हरपर्यंत सगळ्या मुख्य बोलर्सनी मार खाल्ला की शेवटी कोण या प्रश्नाला सेहवाग उत्तर म्हणून फिट्ट बसत होता.मग अचानक काय झालं?

तोच सेहवाग (मुख्यतः) पहिल्या ते (जास्तीत जास्त) तिसर्या षटकापर्यंत कीपर ते स्लीप या पट्यात कॅचिंग प्रॅक्टिस देऊन जायला लागला. आधी आउट होत नव्हता असे नाही. पण निदान ३०-४० धावा तरी करत होता. आणि आता ५ सामन्यातून एकदा ३० धावा काढल्या की धन्य वाटून घेणारा सेहवाग बघवत नव्हता. आधी टायमिंग मध्ये झाकले जाणारे त्याचे पदलालित्य (सेहवाग जे काही करतो त्याला 'पायांची हालचाल' हाच शब्दप्रयोग जास्त योग्य आहे) आता सपशेल उघडे पडत होते. कधी काळी स्विंग बोलिंगला लीलया धुणारा सेहवाग सरळ बॉलवर सरळ कॅच देऊन सरळ तंबूत परतत होता. शेवटी आपल्याच लोकाना दया आली. एखाद्याची अब्रू किती घालवायची? मग बाहेर बसवला त्याला.

आता बघू, काय करतो पठ्या!! घोडमैदान लांब नाही. कमॉन सेहवाग..

No comments: