Friday, September 14, 2007

आपले commentators

स्टार क्रिकेट ही वाहिनी सुरू झाल्यापासून मॅच बघायला जरा जास्तच मजा यायला लागली आहे. एका वेळी दोन दोन चॅनेलवर मॅच चालू म्हणजे ताटात आमरस आणि श्रीखंड. दोन्ही गोडच!! पण चव मात्र वेगळी. इथे चवीचा प्रश्न नाही तर कॉमेंटरी वेगळी. एकीकडे हिन्दी तर एकीकडे इंग्रजी! त्यामुळे जर आपला बॅट्समन नांगर टाकून बसला (इथे बॅट्समन हा शब्द गौतम गंभीर किंवा नॅटवेस्टच्या पहिल्या मॅचमध्ये धोनी असा वाचावा) किंवा आपल्या गोपाळ गणेशानी (आगरकर ओ, अजित आगरकर गो गं चा वसा चालवत आहे. 'आधी समाज सुधारा मग स्वातंत्र्य मिळवू' तसं याचं 'आधी धोनीची कीपिंग सुधारा -आडवे तिडवे बॉल टाकून- मग विकेटचं बघू'. पण बॅट्समन लेकाचे मध्ये बॅट घालून त्याचा प्रयत्न हाणून पाडतात. कारण धोनीची कीपिंग सुधारली तर किमान १५-२० रनचा फटका!) स्टम्प सोडून सगळीकडे चेंडू टाकायला सुरुवात केली की आपल्याला समोरचे चित्र इच्छा नसताना बघत बसावे लागत नाही. फक्त इतकंच करायचं, स्टार क्रिकेट लावायचं आणि डोळे मिटून घ्यायचे.

3मग मोहिंदर अमरनाथ आणि ग्रुप -मदनलाल, अरुण लाल, अन्शुमन गायकवाड, चेतन शर्मा, झहीर अब्बास, अतुल वासन, मणिंदर सिंग- यांचा एक अंकी, (एका वेळी) दोन पात्री, धमाल विनोदी (ऐकाल तर हसाल, न ऐकाल तर फसाल) प्रयोग ऐकायचा. यातले काही जण इंग्रजी आवृत्तीकडे दिसतात पण लेव्हल तीच. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की सगळ्याना एका प्रकारचेच विचार, समान आणि भरपूर चुका, चांगल्याला वाईट आणि वाईटाला चांगले म्हणणे हे सारे आतून आणणे कसे जमते? आणि 'आम्ही हिंदी बोलतो' हे दाखवण्यासाठी ते जे भाषांतर करतात ते कधी कधी झीट आणणारे असते.

परवाच इंग्लिश गोलंदाज गांगुलीवर उसळत्या चेंडूंचा मारा करत होते आणि कमेंटेटरने (त्याचे नाव टिपून न घेण्याची महान घोडचूक आमच्या हातून झाली) 'short ball' याचे शब्दश: भाषांतर केले की 'छोटी गेंद'. माझी हसून हसून पुरेवाट होतेय तोपर्यंत पुन्हा तसाच चेंडू आणि 'और एक बार छोटी गेंद अँडरसन द्वारा और गांगुली फिर एक बार चुके शॉट लगाने मे' मला शेवटपर्यंत कळाले नाही की 'गेंद' छोटी कशी झाली? युवराज सिंग या वेळी जरा फॉर्मात होता त्यामुळे जेव्हा तो बॅटिंगला यायचा आणि एखादा बॉल खेळून होतोय न होतोय तोपर्यंत यांचं चालू- 'आज युवराज बढिया फॉर्म मे नजर आ रहे है. बढिया टायमिंग और फूटवर्क तो लाजवाब (?)' दोन बॉल खेळल्यावर (त्यातही एक सोडून दिला होता) यांना इतकं कळतं?

सचिन उत्कृष्ट इनिंग्ज खेळत होता. त्याची चारही अर्धशतके डोळे दिपवून टाकणारी होती. त्यातही शेवटच्या दोन वेळी तो अक्षरशः बोलर्सवर तुटून पडला होता. पण यांचं मात्र 'सचिनमे अब वो बात नही रही.' मैदानात सगळ्या बाजूना धावा, मस्कारेन्हासला उत्तुंग षटकार, पुढे येत मारलेले you bowl where you want, i will hit where i want वाले शॉट्स हे सगळे राहिले बाजूला. म्हणे वो बात नही रही. यांच्यापैकी एकानेही कधी बघणार्याचा अंत न पाहता सलगपणे ५० धावा काढल्याचे कधी ऐकिवात नाही. सगळे नुसतेच तोंडची वाफ दवडणारे!! तो चेतन शर्मा म्हणतो द्रविडला शेवटी कुणाला बोलिंग द्यायची हे कळत नाही. त्याच्या जागी मी असतो तर यांव केलं असतं. असं कोण म्हणतोय? ज्याने शेवटच्या बॉलवर ६ रन्स हव्या असताना जावेद मियाँदादला पायावर फुलटॉस दिला होता. तोही फायनल मॅचमध्ये. त्याला मराठी येत नाही, नाहीतर 'तेथे पाहिजे जातीचे येरागबाळ्याचे कामचि नोहे' हे त्याला कुणीतरी सुनावलेच असते. सचिन बॅटिंग करतो हे यांना खुपते. लवकर आऊट झाला तर 'आता सचिन म्हातारा झालाय. रिटायर व्हायला पाहिजे त्याने.' (तो लवकर आऊट झाला असला तरी बर्याचदा त्यातही त्याने सगळ्या तरुणांपेक्षा जास्त धावा केलेल्या असतात.) आणि चांगलं खेळला तरी 'He is playing well. This is the right time for him to retire.' धड त्याला सुखाने खेळू देत नाहीत नि आम्हाला काहीतरी चांगलं बघितल्याचा आनंद मिळू देत नाहीत. सगळे जणू पिंपळाच्या झाडाला लटकणारे मुंजे! जवळ गेलं की मानगुटीवर बसतात.

मग एकच पर्याय राहतो. ऐकायचं, हसायचं आणि सोडून द्यायचं (आजकाल मराठी माणसाचा स्थायीभावच झालाय हा). मग मी तरी हे सारं कशाला लिहितोय? काय करणार. 'दुसर्याचा तो बाब्या नि आपलं ते कार्टं' म्हणणारी ही मंडळी बघितली किंवा ऐकली की राहवत नाही हो. समोरच्याच्या पायातलं कुसळ काढणार्यांच्या डोळ्यातलं मुसळ आपणच काढायला हवं आता!!

No comments: