Tuesday, September 18, 2007

भारतीय पार्ट-टाईम बॉलर्स

खर तर मी "पार्ट-टाईम" बॉलर्स या विषयावर लिहिणार होतो. पण मग पार्ट-टाईम कोणाला म्हणाव यावर माझच एकमत होईना. कारण "पार्ट-टाईम बॉलर" ह्या शब्दाची भारतात असलेली व्याख्या आणि इतर क्रिकेट खेळणा-या देशातली व्याख्या यात जमिन-आसमानाचा फरक आहे.बाकीच्या सर्व देशात असे कुडमूडे गोलंदाज येतात तेच मुळी फलंदाजाच लक्ष विचलीत करायला. रथी महारथी गोलंदाजांना खेळून थकलेला फलंदाज अश्या 'पार्ट-टाईम' गोलंदाजाची पीस काढायच्या प्रयत्नात आपली विकेट फेकतील हा त्या मागचा आशावाद. आणि ब-याचदा हे अस घडत सुद्धा ! उदा. आत्ता इतक्यातच ईंग्लंड मधील नॅटवेस्ट सीरीज मध्ये केविन पीटरसन नी सचीन तेंडूलकरला पहिल्याच षटकात बाद केले होते. आजच्या घडीला जगात असे बरेच "जाने-माने" 'पार्ट-टाईम' गोलंदाज आहेत. मायकेल क्लार्क, ख्रीस गेल, तिलकरत्ने दिलशान, ग्रॅमी स्मिथ, विरेंदर सेहवाग, सायमंड्स वगैरे वगैरे ... या सर्व गोलंदाजांचा अजुन एक विशेष गूण म्हणजे संघाचा 'ओव्हर रेट' कमी पडत असल्यास तो सुधारण्यात यांचा प्रचंड हातभार लागतो. त्यामुळे जवळपास प्रत्येक एकदिवसीय सामन्यात यांना एकदा तरी गोलंदाजीला बोलावलेच जाते.

पण भारतीय क्रिकेटची प्रत्येक गोष्टच निराळी आहे! भारतीय संघ सामन्यातील प्रमूख गोलंदाजांचे(जे ३,४ किंवा ५ यापैकी कितीही असू शकतात) अपयश भरून काढण्यासाठी(जे ३, ४ किंवा ५ गोलंदाजांना एकाच वेळी येते) या 'पार्ट-टाईम' गोलंदाजांना गोलंदाजी देतो. आणि अश्या वेळी या गोलंदाजांकडून अपेक्षा असते तीनच गोष्टींची !
१. धावा कमी द्यायच्या
२. विकेट काढायच्या
३. डावाच्या शेवटच्या हाणामारीच्या षटकात टिच्चून गोलंदाजी करायची.
आता तुमच्या प्रमूख गोलंदाजांना(?) हे जमत नसेल तर हे बापुडे 'पार्ट-टाईम' पंथाचे गोलंदाज हे कस करणार?

पण नाही. आम्हाला हे मान्य नाही. आम्हाला पार्ट-टाईम गोलंदाजांवर खूप प्रेम आहे. बदाणी, दिनेश मोंगीया, सेहवाग, आणि पार्ट-टाईम गोलंदाज शिरोमणी युवराज सिंग ही आमची प्रमूख आणि छूपी अस्त्रे आहेत! कधी कधी सचीन रमेश तेंडूलकर आणि सौरव चंडीदास गांगुली अशी 'इलाईट' लोकही या क्लब मध्ये हजेरी लावतात. हे सगळेच गोलंदाज एक, दोन किंवा फार फार तर तीन ओवर्स फलंदाजाला जखडून(म्हणजे ५ किंवा ६ धावा प्रती ओवर) ठेवू शकतात.
कारण २-३ ओवर्स नंतर त्यांच्या मा-यातील प्रत्येक प्रकारच्या चेंडूची कल्पना फलंदाजाला आलेली असते आणि धावा वाचवणे हे प्रमूख काम असल्यामुळे एकाच प्रकारचे चेंडू आणि ते ही झटापटा टाकणे हे एकच उद्दीष्ट समोर ठेऊन गोलंदाज बॉल टाकत असतात. 'नो व्हेरिएशन ऍंड नो क्रीएटीविटी' अस यांच समीकरण !

पण भारतीय 'थिंक टॅंक' च काय मत आहे देव जाणे. युवराज सिंगला ईंग्लंडमध्ये जे पाच बॉलमध्ये ५ छक्के बसले ते या एकसूरी बॉलींगचा एक अप्रतीम नमुना म्हणून कुठल्याही क्रीकेटविषयक अभ्यासक्रमात स्थान मिळवू शकतात. बर त्याने पहिल्या ३ ओवर्स छान टाकल्या होत्या म्हणून त्याला गोलंदाजी दिली हे भारतीय कप्तानाच म्हणण आपल्याला काही पटत नाही. शेवटी युवराज सिंगने प्रमूख बॉलर्सच्या ओवर्सपैकी ३-४ ओवर्स किफायतशीरपणे कमी करण्यात महत्वाच काम केल अस न मानता तोच भारताचा तारणहार आहे अस मानून आपले कप्तान त्याल बॉलींग देतात आणि तो पुढच्या ६ चेंडूत ५ छक्के देतो ही गोष्ट तुम्हाला तरी पटते का?

बर आपल्या चुकांमधून शिकायच असत हे भारतीय क्रिकेट टीमला माहितीच नाहीये. कारण परवाच्या २०-२० मॅच मध्ये युवराजने २ ओवर्स मध्ये केवळ १२ धावा दिल्या म्हणून युवराजला परत बॉलींग देण्याचा धोणीचा निर्णय चुकीचा ठरला व युवराजला त्या ओवर मध्ये ३ छक्के बसले, एकूण धावा २५ ! पठाणच्या २ ओवर्स बाकी असताना युवराजला बॉलींग देण्याचा निर्णय साफ चूक होता असे ब-याच क्रीकेट प्रेमींचे मत आहे. पिटरसनने सचीनची विकेट घेतली असूनही ईंग्लंडनी त्याला त्यानंतर एकही ओवर दिली नाही यावरून त्यांचा 'क्रिकेटींग सेंस' दिसून येतो.

भारतीय संघाला कधी पुर्ण क्षमतेने गोलंदाजी करणारे ५ गोलंदाज मिळणारेत देव जाणे, पण भारतीय कप्तानांनी आपल्या चुकांची पुनरावृत्ती तरी टाळावी आणि 'पार्ट-टाईम' गोलंदाजांना 'पार्ट-टाईमच' गोलंदाजी द्यावी ही माफक अपेक्षा .. !

No comments: