Saturday, September 15, 2007

द्रवीडचा राजीनामा

"भारतीय क्रिकेटमध्ये तसही सतत काही तरी सनसनाटी घडत असत आणि तुम्ही म्हणता फक्त आमच्याच संघाला सनसनाटीची आवड आहे." इति एका पाकिस्तानी खेळाडूची द्रवीडच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याची बातमी फुटल्यानंतरची प्रतिक्रीया !


गुरु चॅपेल च्या नियुक्तीनंतर तर या प्रकाराला (सनसनाटी) उधाण आल होत. चॅपेल आल्यानंतर गांगुलीला डच्चू मिळाला आणि द्रवीड कर्णधार झाला. तस पाहता गांगुलीला डच्चू मिळावा अस जवळपास प्रत्येक भारतीयाला वाटत होत कारण एरवी तोफेसारखी धडाडणारी गांगुलीची बॅट जवळपास वर्षभर दिवाळीतल्या टिकल्या फोडणा-या बंदुकीसारखी झाली होती, चॅपेल हे एक निमित्त झाल!

पण त्यानंतर जवळपास २ वर्ष भारताच्या सर्वात सातत्यशील फलंदाजाकडे भारतीय संघाच कर्णधारपद आल. आणि चॅपेल-द्रवीड जोडगोळीने स्वप्नवत सुरुवात केली. श्रीलंका ६-१, दक्षीण अफ्रीका २-२ बरोबरी अशी चमकदार कामगीरी केल्यावर विंडीज मध्ये १-० ने कसोटी मालिकेत विजय ! भारतीय संघ विश्वचषक जिंकणार आणि राहुल द्रवीड हा या परिकथेचा नायक होणार अशी चित्र रंगवली जाउ लागली.

पण हाय रे किस्मत ! परिकथा परिकथाच निघाली. द्रवीडने यश चाखल, आणि जितक यश पाहिल तितकच अपयश ही पाहील. विंडीज मध्ये ४-१ नी मार खावुन आलेला भारतीय संघ नंतर चँपीयन ट्रॉफी मध्ये गळपटला. त्यानंतर विश्वचषकात तर कमालच झाली. नवख्या बांग्लादेशने पहिल्याच सामन्यात "जगातील (कागदावरील) सर्वात बलाढ्य फलंदाजीचे " वाभाडे काढले. त्यानंतर भारत श्रीलंकेकडून सपाटून हारला आणि मानहानीकारकरित्या पहिल्या फेरीतच बाद झाला. फलंदाजांचे अपयश हा या सर्व दारूण पराभवांमधला समान दुवा होता.विश्वचषकापर्यंत सर्वांच्या गळयातला ताईत असलेल्या द्रवीडच्या नावाने ओरडा सुरु झाला. जणु काही सर्व पराभवांना द्रवीडच जबाबदार आहे. जणु काही द्रवीडच प्रत्येक सामन्यात ६-७ वेळा फलंदाजीला येउन अपयशी ठरतोय. भारतीय क्रिकॆट हे उगवत्या सुर्याला पुजत आणि द्रवीड मावळतीकडे वाटचाल करतोय अशी हाकाटी सुरु झाली.

तरी निवड समितीने दक्षीण अफ्रीकेच्या खडतर दो-यावर त्यालाच कर्णधार नेमले. आणि भारतानी २०-२० सामना आणि १ कसोटी सामना वगळता विजय काय असतो हे पाहिले नाही. घरी "शेर" आणि बाहेर "ढेर" ह्या एका वाक्यात भारतीय संघाची हेटाळणी केली जाउ लागली. त्यातच गांगुलीने दमदार पुनरागमन केले असल्यामुळे त्याला कर्णधार करा असा एक सूर सुरु झाला.पण ईंग्लंडच्या दौ-यावर कमाल झाली. भारत कसोटी मालिका १-० जिंकला आणि एकदिवसीय मालिकेत अगदी पुसट फरकाने हारला (प्रत्यक्षात पराभव ३-४ असा झाला असला तरी खेळाच्या दर्ज्यातला फरक ०-७ असा होता हे प्रत्येक क्रिकेटप्रेमी कबूल करेल ! ).

आणि या 'कम-बॅक' नंतर द्रवीड कर्णधारपद सोडत असल्याची बातमी आली. द्रवीड कर्णधार विरुद्ध द्रवीड फलंदाज यातला फलंदाज मरणपंथाला लागायच्या आत कर्णधारपदावरुन उतरण्यातच शहाणपणा आहे हे द्रवीडने ओळखले आणि हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. तसे पाहता द्रवीडची कर्णधारपदाच्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यांतील सरासरी ४४ आणि कसोटीतली सरासरी ५१ आहे आणि कुठलाही क्रिकेट पंडीत याला "घसरण" म्हणू शकत नाही. पण द्रवीड हा आकड्यांच्या चादरीत स्वत:ला गुरफटून घेणारा फलंदाज नाही. द.अफ्रीका आणि ईंग्लंड दो-यांमध्ये ६ कसोटी सामने मिळून द्रवीडने जवळपास २५०-३०० धावा केल्यात ज्या द्रविडीयन स्टॅंडर्ड ने फारच किरकोळ आहेत ! आणि स्वत:चा खेळ चांगला असावा याबद्दल प्रचंड आग्रही असलेल्या द्रवीडला हीच बाब खटकली असणार. १०० कोटी लोकांच्या अपेक्षांचे ओझे डोक्यावर घेउन मैदानावर उतरणा-या, प्रतिस्पर्ध्याला ७ सामन्यांच्या मालिकेत एकदाही सर्वबाद करू न शकलेल्या, एका सामन्यात ३२९ धावा काढून ९ धावांच्या फरकाने केविलवाणा विजय मिळवणा-या, मागच्या सामन्यात ३०० च्या वर धावा काढल्यानंतर पुढच्याच सामन्यात २०० धावाही करु न शकणा-या आणि एकाच सामन्यात ५ झेल आणि १ स्टंपींग सोडणा-या संघाची धूरा सांभाळताना द्रवीड स्वत:तल्या फलंदाजाला योग्य न्याय देउ शकला नाही. वरून निवड समितीतली शहाणी लोकं, क्रिकेटच्या खेळातील पैश्याची मलई ओरपणारे लोक आणि काहिही झाल की 'मॅच का मुजरीम" शोधणारा मिडीया यांच्याकडून कर्णधाराची होत असलेली घुसमट वेगळीच !


पण द्रवीडने घेतलेला निर्णय 'लॉंग-टर्म' चा विचार करता योग्यच आहे. आज भारतापुढे अनेक खडतर दौरे आ वासून उभे असताना भारताला त्याच्या सध्याच्या घडीतल्या सर्वोत्तम फलंदाजाकडून धावांच्या बरसातीची अपेक्षा आहे आणि तीच पूर्ण करण्याची मनिषा बाळगून द्रवीडने भारतीय कर्णधारपदाचा काटेरी मुकूट स्वत:हून उतरवून निवड समितीकडे भिरकावलाय. आता हा काटेरी मुकूट कोणाच्या डोक्यावर चढतो हे बघणे रोचक ठरेल. मग परत एकदा आहेच "ये रे माझ्या मागल्या". परत नवा भिडू नवा राज्य या प्रकारे नवा कोच नवा कॅप्टन !

No comments: