Thursday, September 20, 2007

निवड समितीत मी

६+५ = ७+४ = सावळा गोंधळ
आपल्या टीमचे कॉम्बिनेशन हा निवड समिती तसेच २४ तास आतापर्यंतच्या बातम्या देणार्या वाहिन्यांवर चर्पटपंजरी करून पोटाची खळगी भरणारे अनेक माजी (व आपटलेले) क्रिकेटपटू आणि घरा-घरातील क्रिकेट पंडित यांच्या अतीव जिव्हाळ्याचा व काळजीचा विषय आहे. कोणतीही मॅच चालू असली की बर्याचदा स्टेडिअममध्ये निवड समिती सभासद दिसतात. समोर काय चालू आहे याची अजिबात तमा न बाळगता पुढच्या दौर्यात कुणाला घ्यायचे आणि कुणाला डच्चू द्यायचा हा प्रश्न त्यांच्या चिंताग्रस्त चेहर्यावर स्पष्टपणे
दिसून येतो. जसा जसा सामना पुढे सरकतो तसा हा प्रश्न त्यांच्याकडून खेळाडूंकडे जातो. आणि जिंकायचे चान्सेस असलेला आपला संघ हमखास मार खातो. मग प्रत्येक घरात संघ निवडीपासून, टाकलेल्या कॅचपर्यंत आणि हरभजनने ग्रिप कशी सुधारली पाहिजे इथपासून सचिनने कव्हर ड्राईव्ह कसा खेळायला हवा पर्यंत अनेक गोष्टींचे शव विच्छेदन होते. ज्याना बोलायला कुणी मिळत नाही ते आपले फोर्थ अंपायर, फॉलो थ्रू यासारखे कार्यक्रम बघत बसतात. या सर्व लोकांची निराशा टाळण्याकरता आम्ही असे ठरवले आहे की या वेळी निवड समितीपुढे आदर्श घालून द्यायचा. म्हणजे संघ निवडून द्यायचा.

आता भारत म्हणजे काही ऑस्ट्रेलिया नाही की तुमच्या कडे १५-२० टॉप क्लास प्लेयर्स आहेत, त्यातले कुठलेही ११ उचला, झाला संघ तयार!! त्यामुळे मेंदूच्या खलबत्त्यात विचाराना कुटून, तयार झालेले रसायन तर्काच्या गाळणीतून गाळून घेतल्यावर आम्हाला ही संघरचना योग्य वाटली. सुरुवात करु निवड पक्की असलेल्यांपासून-
सचिन, द्रविड, गांगुली, युवराज, धोनी आणि झहीर.

बाकीच्यांचा विचार करण्याआधी किती फलंदाज आणि किती गोलंदाज ते ठरवू. (आपल्याकडे ऑलराऊंडर नावाची किंवा त्याच्या जवळपास जाणारी एकही गोष्ट नसल्यामुळे अस्मादिकांचे काम बरेच सोपे झालेले आहे.) आपल्या बोलर्सचा एक मोठा गुण आहे. ४ घ्या नाहीतर ५. ३०० रन्स देणार म्हणजे देणार. त्यांचे हे वाखाणण्याजोगे सातत्य आणि आपल्याकडच्या पाटा विकेट्स पाहता ५ बोलर्स खेळवणे म्हणजे आटलेल्या म्हशीला 'मोठी गुणाची आहे हो, कधी कधी लाथ म्हणून मारली नाही' म्हणून चारा घालण्यासारखे आहे. त्यापेक्षा समोरच्या संघाला सुखाने त्यांच्या वाटणीच्या ३००-३२५ धावा करु द्याव्यात, मग ७ बॅट्समन घेऊन पाठलाग करावा, हे भारतीय विकेट्सवरचे पेटंट धोरण वापरावे. चुकून पहिल्यांदा बॅटिंग करावी लागली तर ३०० वर काढाव्यात म्हणजे आपले मंदगती गोलंदाज प्रभावी ठरतील (आता मंदगती म्हणजे फिरकी हे सहज लक्षात येते पण ४-५ वर्षांपूर्वी फक्त मंदगती हा शब्द ऐकला की श्रीनाथच डोळ्यासमोर यायचा.)

तर सांगायचा मुद्दा असा की ७ बॅट्समन ला आमचा पूर्ण पाठिंबा!! आता त्यातले ५ तर नक्कीच आहेत. मग राहतात दोन. या दोन जागांसाठी तमाम अर्जांमधून आम्ही चार नावे निश्चित केली आहेत. दिनेश कार्तिक, सेहवाग, उथाप्पा, गंभीर. आपल्याकडच्या पिचवर technique चा एवढा काही प्रश्न येत नसल्यामुळे (नाहीतर सेहवाग इतका मोठा प्लेयर कसा बरे झाला असता?) आणि जरी थोडाफार आला तरी आपली त्रिमूर्ती + अर्धा युवराज असे साडेतीन लोक पुरेसे होतील असे वाटते. म्हणून आमची पहिली पसंती राहील सेहवाग आणि उथाप्पाला. हा गौतम गंभीरवर अन्याय होत असला तरी एकूण ११ आणि फलंदाजीवाले ७च जण घ्यायचे असल्यामुळे काही करता येत नाही. लोक म्हणतात सेहवागकडे फूटवर्क नाही, तो जास्त वेळ टिकणार नाही. मग त्याला कशाला घ्यायचे? सेहवागला यासाठीच घ्यायचे की तो जास्त वेळ टिकणार नाही. सेहवाग कितीही वाईट फॉर्ममध्ये असला तरी जगातला कुठलाही संघ सचिनवर concentrate करून सेहवागला लायसन्स देण्याचा विचार करणार नाही. त्यामुळे सेहवाग ३-४ ओव्हर टिकला तरी सचिनला निवांतपणे सेटल् होता येईल. म्हणूनच समीकरण असे बनते की

गंभीर + सचिनवर प्रेशर (गंभीर हा स्लो स्टार्टर आहे) किंवा सेहवाग + निवांत सचिन. इथेच सेहवाग बाजी मारतो. सेहवागने कितीही काढल्या तरी चालतील पण त्याने आक्रमक खेळावे. लवकर आऊट झाला तर बाकीचे आहेतच की डाव सावरायला. गांगुली, युवराज आणि द्रविड मधल्या ओव्हर्स व्यवस्थित खेळू शकतात. आणि हाणामारी करायला धोनी व उथाप्पा आहेतच. दिनेश कार्तिक हा बहुत करुन कैफ टाईपचा बॅट्समन आहे. 'ढकला आणि पळा.' डावाच्या शेवटी फटकेबाजी करायला तो काहीसा कमी पडतो. आणि सध्यातरी मधल्या फळीत जागा नाही. गांगुली तिसर्या क्रमांकावर आल्याने त्याला न आवडणारे उसळते चेंडू फारसे खेळावे लागणार नाहीत. आणि सेहवागच ओपनिंग करत असल्यामुळे गांगुलीला काही फार काळ वाट बघावी लागणार नाही.

गोलंदाजीमध्ये झहीर निश्चितच आहे. नंतरचे दोन आहेत आर पी आणि पठाण. फिरकीमध्ये हरभजन, पोवार आणि चावला तिघे आहेत. शिवाय सेहवागचा ऑफस्पिनर म्हणून उपयोग होईल. त्यामुळे हरभजन किंवा पोवार यांपैकी एकालाच खेळवता येईल. सध्या तरी दोघेही चांगली गोलंदाजी टाकत आहे. पोवारचा इकॉनॉमी रेट चांगला आहे पण डावाच्या शेवटी गोलंदाजीचा अनुभव त्याच्याकडे नाही. आणि अलिकडच्या सामन्यांमध्ये शेवटी धावांचा ओघ रोखण्यात आलेले अपयश पाहता हरभजनचा अनुभव ही महत्त्वाची गोष्ट ठरेल. ४ च गोलंदाज खेळवायचे असल्यामुळे पठाणच्या फलंदाजीकडे थोडा वेळ दुर्लक्षच करणे योग्य ठरेल. निव्वळ गोलंदाजीवर आर पी मूव्हमेंट्मुळे सरस ठरतो. तरीही भारतात आर पी ला मूव्हमेंट मिळणे कठीण असल्यामुळे दोघांमध्ये कुणाला घ्यायचे हा फार मोठा प्रश्न आहे.

म्हणजे शेवटी टीम अशी झाली-

सचिन, सेहवाग (ओपनिंग)

गांगुली, युवराज, द्रविड

उथाप्पा, धोनी,

हरभजन, चावला,

झहीर, आर पी, पठाण

(शेवटच्या दोघांपैकी एक)


1 comment:

Ameya Girolla said...
This comment has been removed by the author.